केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त पठारे दाम्पत्याचा सेवाभावी उपक्रम
एक हजारांहून अधिक अन्नधान्य किटचे संकलन; दानशूर नागरिकांकडून अन्नधान्य खरेदीसाठी पाच लाखांचे धनादेश; आरोग्य तपासणी, नेत्रसेवा आणि रक्तदान शिबिराचेही आयोजन

पुणे : (दीपक नायक) केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त चंदननगर येथे नगरसेवक सुरेंद्र बापूसाहेब पठारे आणि नगरसेविका ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत एक हजारांहून अधिक गरजू कुटुंबांसाठी अन्नधान्य किटचे संकलन करण्यात आले. तसेच अधिक अन्नधान्य खरेदीसाठी दानशूर नागरिकांनी तब्बल पाच लाख रुपयांचे धनादेश सुपूर्द केले.
‘बळीराजाची दिवाळी गोड व्हावी’ या सामाजिक संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या अन्नधान्य किट संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमासाठी महेंद्र भाडळे यांनी तीन लाख रुपयांचा, तर अन्य दोन दानशूर नागरिकांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देऊन सहकार्य केले. त्यामुळे अन्नधान्य खरेदीसाठी एकूण पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला.
अन्नधान्य किट उपक्रमासोबतच महिलांसाठी मोफत विशेष आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी, चष्मा वाटप आणि मोतीबिंदू तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. गरजू घटकांना मदतीचा हात देण्यासोबतच आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा या उपक्रमांचा उद्देश होता.
या उपक्रमासाठी उन्नती मोटर्स, खराडी, कोठारी ह्युंदाई मोटर्स, खराडी, मदरहूड हॉस्पिटल, खराडी, वाघोली वेल्फेअर फाउंडेशन, सखी प्रेरणा मंच, खराडी सोसायटीज हाऊसिंग वेल्फेअर असोसिएशन, आदित्य खांदवे फाउंडेशन, अॅजिलियाड टेक्नॉलॉजीज, पुणे, रामेश्वर कॅफे, विमाननगर, आनंद विद्यानिकेतन शाळा, विमाननगर यांच्यासह अनेक संस्था आणि नागरिकांनी अन्नधान्य किट देऊन योगदान दिले.
यावेळी नगरसेवक रामदास दाभाडे, नारायण गलांडे, नगरसेविका रत्नमाला सातव, संगीता दांगट, श्रेयस खांदवे, भाजप पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, माजी सभापती अशोकबापू खांदवे. संदीप भोंडवे, , मंगेश गोळे, संदीप सातव, महेंद्र भाडळे, संदीप दांगट, महेश गलांडे, आदित्य खांदवे, विशाल साळी, सुधीर वाघमोडे, अर्जुन जगताप, संतोष सुकाळे, राहुल जाधव, अदिती बाबर, शैलेश राजगुरू, प्रीतम खांदवे, वडगावशेरी-खराडी मंडल अध्यक्ष आशिष देशमुख, विमाननगर-सोमनाथनगर मंडल अध्यक्ष नितीन जाधव, लोहगाव-धानोरी मंडल अध्यक्ष संदीप मोझे यांच्यासह विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बळीराजाची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने अन्नधान्य किट संकलनाचा उपक्रम राबविण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्र तपासणी, चष्मा वाटप व मोतीबिंदू तपासणी, तर महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर नागरिकांचे मनःपूर्वक आभार. – ऐश्वर्या पठारे (नगरसेविका, मनपा, पुणे)
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक हजारांहून अधिक गरजू कुटुंबांसाठी अन्नधान्य किटचे संकलन करण्यात आले. या उपक्रमासाठी दानशूर नागरिकांनी पाच लाख रुपयांचे धनादेश देऊन मोलाचे सहकार्य केले. आरोग्य तपासणी, नेत्रसेवा आणि रक्तदान यांसारख्या उपक्रमांतून नागरिकांना मदत मिळावी, हाच यामागील उद्देश आहे.
– सुरेंद्र पठारे (नगरसेवक, मनपा, पुणे)










