डॉ. शंकर वावरे ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित
वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव; वाघोली डॉक्टर्स असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम
वाघोली : वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लाईफ लाईन हॉस्पिटलचे संचालक डॉ. शंकर वावरे यांना वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. वाघोली येथील सिझन्स बँक्वेट हॉलमध्ये आयोजित दांडिया सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने हा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
वाघोली डॉक्टर्स असोसिएशनचे संस्थापक डॉ. विनोद सातव, अध्यक्ष डॉ. प्रशांत मते आणि खजिनदार डॉ. ऋचा कोलते यांच्या हस्ते डॉ. शंकर वावरे यांना पुणेरी पगडी घालून सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. वावरे यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. सूर्यकांत देवकर, डॉ. स्मिता कोलते, डॉ. अनिता सातव यांच्यासह पुण्यातील विविध कॉर्पोरेट हॉस्पिटलमधील डॉक्टर, पत्रकार आणि वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य डॉ. रवि धायगुडे, डॉ. अमृता विधाते, डॉ. ज्ञानेश्वर टेमक, डॉ. संदीप मोदानी, डॉ. रश्मी मोदानी, डॉ. स्वाती कळसकर, डॉ. पद्मा कहाटे, डॉ. नेहा थोरात, डॉ. अनिकेत कड, डॉ. हरिओम जोगदंड, डॉ. नारायण ताठे, डॉ. किरण औटी, डॉ. वृषाली खांदवे, डॉ. शितल जाधव, डॉ. सुरेंद्र दगडे, डॉ. प्रचित सातव, डॉ. ओंकार जाधव, डॉ. रोहिणी मते आणि डॉ. विजिता नायर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या गौरव सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा, विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच उपस्थित पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला.
वाघोली डॉक्टर्स असोसिएशनचे सुमारे २५० सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्यासोबत आयोजित दांडिया कार्यक्रमात डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आनंद, उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा आणि दांडिया सांस्कृतिक कार्यक्रम दिमाखात पार पडला.










