येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नगरसेवक अविनाश साळवे यांची मागणी
येरवडा : येरवड्यातील चित्रा चौक परिसरात महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खोल खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) घडली असून परिसरात हळहळ व्यक्त व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकून त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेवक अविनाश साळवे यांचेसह सामाजिक कार्यकर्ते शशिकांत साटोटे यांनी केली आहे.
प्रदीप लक्ष्मण परदेशी (वय ६९) असे मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे.
चित्रा चौक परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्त्यावर सुमारे १० ते १५ फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून जात असताना प्रदीप परदेशी यांचा तोल जाऊन ते या खड्ड्यात पडले. या दुर्घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
ड्रेनेज लाईनचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या कामाबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. असे असतानाही खोदलेल्या खड्ड्याभोवती नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खोल खड्ड्याभोवती मजबूत लोखंडी बॅरिकेड्स उभारणे, रात्रीच्या वेळी स्पष्टपणे दिसणारे इशारा दिवे व सूचना फलक लावणे, तसेच पादचारी आणि वाहनचालकांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक असते. मात्र, या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, ड्रेनेजसारखी अत्यावश्यक कामे करताना नागरिकांच्या जीविताची आणि सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर असते. कामाच्या ठिकाणी योग्य खबरदारी घेतली असती, तर ही दुर्घटना टाळता आली असती का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. तसेच वाहतूक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली नसल्याची तक्रारही पुढे आली आहे.
या दुर्घटनेप्रकरणी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात संबंधित ठेकेदार आणि रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दुर्घटनेला नेमके कोण जबाबदार आहे, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन झाले होते का आणि संबंधित यंत्रणेकडून देखरेख करण्यात आली होती का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.
एका ज्येष्ठ नागरिकाला जीव गमवावा लागल्यानंतर तरी महापालिका प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांना संपर्क केला असता तपास चालू आहे, अजून गुन्हा दाखल झाला नाही. मयताचे नातेवाईक अंत्यविधी करून येणार आहेत. उद्या दाखल करू असे स्पष्ट केले.
» ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – नगरसेवक साळवे
चित्रा चौकातील दुर्घटनेबाबत नगरसेवक अविनाश साळवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. खड्ड्याभोवती मजबूत लोखंडी बॅरिकेड्स लावणे अपेक्षित असताना हलक्या दर्जाचे बॅरिकेड्स लावण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेऊन त्याला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे आणि त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली असल्याचे साळवे यांनी सांगितले.
येरवड्यातील चित्रा चौकात ड्रेनेज लाईनचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ज्येष्ठ नागरिकाला जीव गमवावा लागला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त पवनित कौर यांच्याकडे दूरध्वनीवरून केली आहे.
– शशिकांत साटोटे (सामाजिक कार्यकर्ते, येरवडा)










