वाघोली महावितरणचा ग्रामीणमधून शहरी विभागात समावेश

आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; वीज ग्राहकांना दिलासा

वाघोली :  शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर (आबा) कटके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, वाघोली परिसरातील महावितरणच्या तीन शाखांचा ग्रामीण विभागातून रस्तापेठ शहर मंडळांतर्गत समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे वाघोली आणि परिसरातील वीज वितरण व्यवस्थेचे प्रशासकीय नियंत्रण शहरी विभागाकडे वर्ग झाले असून, वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिक प्रभावी यंत्रणा उपलब्ध होणार असल्याने वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

पुणे ग्रामीण मंडळ कार्यालयांतर्गत मुळशी विभागातील हडपसर ग्रामीण उपविभागात समाविष्ट असलेल्या वाघोली, साईसत्यम आणि विठ्ठलवाडी-वाघोली या तीन शाखांचा कार्यभार आता रस्तापेठ शहर मंडळ कार्यालयांतर्गत नगररोड विभागातील विश्रांतवाडी उपविभागाकडे सोपविण्यात आला आहे.

यामध्ये वाघोली शाखेतील २५ हजार ६६५, साईसत्यम शाखेतील २७ हजार ७५९ आणि विठ्ठलवाडी-वाघोली शाखेतील २४ हजार ९०२ अशा एकूण ७८ हजार ३२६ वीज ग्राहकांचा समावेश आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्येतील वाढ आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेता, या शाखांचा शहरी विभागात समावेश होणे महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

वाघोली आणि परिसरातील नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्या, तक्रारींचे निराकरण, देखभाल-दुरुस्ती आणि प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम पद्धतीने व्हावे, या दृष्टीने आमदार माऊली आबा कटके यांनी महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

वाघोली परिसरात वेगाने वाढणाऱ्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा आणि मूलभूत सेवा सक्षम करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महावितरणच्या या तीन शाखांचा शहरी विभागात समावेश होणे हे महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे वीज वितरण व्यवस्थेचे नियोजन, प्रशासकीय समन्वय आणि ग्राहक सेवेत सुधारणा होण्यास मदत होऊ शकते.

महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने १७ सप्टेंबर रोजी यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे वाघोली परिसरातील वीज वितरण व्यवस्थेला शहरी विभागाच्या प्रशासकीय चौकटीत आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

» वाघोलीकरांचे जीवन अधिक सुकर करण्यासाठी कटिबद्ध 

वाघोलीची लोकसंख्या जवळपास ५ लाखांच्या आसपास पोहोचली आहे, तर वीज ग्राहकांची संख्याही १ लाखाच्या पार गेली आहे. नागरीकरण वेगाने होत असताना वाघोलीला ग्रामीण ढाच्यातून बाहेर काढून शहरी सुविधा मिळवून देणे गरजेचे होते. यासाठी आमदार कटके यांचा महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी व ऊर्जा मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर वाघोलीच्या तीन शाखांचा शहर विभागात समावेश झाला आहे. यामुळे वाघोलीला अतिरिक्त मनुष्यबळ आणि निधी मिळणार आहे. तसेच, लवकरच येथे स्वतंत्र उपविभाग कार्यालय निर्माण करण्यासंदर्भात ही प्रस्ताव मुंबई कार्याकडे पाठवण्यात आला आहे.  त्यामुळे  वाघोलीकरांना वीज बिल दुरुस्ती, नवीन कनेक्शन किंवा इतर तक्रारींसाठी इतरत्र जावे लागणार नाही, सर्व सुविधा एकाच ठिकाणी आहेत. वाघोलीकरांचे जीवन अधिक सुकर करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांनी दिली आहे.

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page