सिल्लोड पोलिसांची डीजे विरोधात धडक कारवाई
ध्वनीप्रदूषण प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
सिल्लोड : सण-उत्सवांच्या काळात किंवा अन्य प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून कर्णकर्कश ध्वनीप्रदूषण करणाऱ्या आणि साऊंड सिस्टिम बसवून नागरिकांना त्रास निर्माण करणाऱ्यांविरुद्ध सिल्लोड पोलिसांनी कठोर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. अंधारी (ता. सिल्लोड) येथे नियमांचे उल्लंघन करून वाहनावर लोखंडी सांगाडा उभारून त्यावर साऊंड सिस्टिम चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगामी सण-उत्सव शांततेत व नियमांच्या चौकटीत पार पडावेत यासाठी मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) सिल्लोड येथील स्वस्तिक लॉन्सवर सिल्लोड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित काइंगडे यांच्या अध्यक्षतेखाली सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कवठाळे, सिल्लोड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी विशेष शांतता बैठक आयोजित केली होती. या बैठकीस सोयगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिनकर गोरे, फर्दापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुधीर मोठे, अजिंठा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पवन इंगळे यांचेसह सिल्लोड शहर व ग्रामीण भागातील गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत सणांचे पावित्र्य आणि आनंद टिकवून ठेवत शांततेच्या मार्गाने उत्सव साजरा करणाऱ्या, नवीन पिढीला अभ्यासासाठी प्रवृत्त करणाऱ्या व समाजाला सकारात्मक दिशा देणारे अभिनव सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांना व सर्वधर्मीय आयोजकांना पोलीस प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. उत्सव मंडळांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून नागरिकांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले होते. आवश्यक तो पोलीस बंदोबस्त व पोलीस मदत पुरविण्याचे आश्वासन दिले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषण विषयक मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, क्षमतेपेक्षा अधिक आवाजाचे कोणतेही ध्वनिवर्धक वापरू नयेत, विनापरवाना ध्वनिवर्धक न लावणे, डीजे व बेन्जोचा अवैध वापर टाळणे याबाबत अत्यंत स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.
प्रशासनाच्या स्पष्ट सूचना असतानाही शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर) अंधारी येथे पोळा उत्सव समिती मंडळाकडून पोळा सणाच्या निमित्ताने आनंद लाला चव्हाण (वय २३ वर्षे, रा. बनवटी) याची साऊंड सिस्टिम अंधारी गावात आणून वाहनावर तयार केलेल्या लोखंडी सांगाड्यावर बसवण्यात आली होती. साउंड सिस्टीम बसवून सार्वजनिक रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होईल व जनतेला त्रास होईल अशा पद्धतीने चालवले जात असल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार काळे करत आहेत.
सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक विश्वजित काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोलीस हवालदार पवार यांनी केली आहे.
» पोलीस प्रशासनाचा सक्त इशारा व आवाहन
यापुढे सिल्लोड व सोयगाव तालुक्यात गणेशोत्सव अथवा इतर कोणत्याही सणादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषण प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्यास, विनापरवाना डीजे सिस्टिमचा वापर केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. राज्य शासनाने गणेशोत्सव हा राज्योत्सव म्हणून घोषित केला आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम व सामाजिक जबाबदारी व भान ठेवून उत्कृष्ट असे अभिनव उपक्रम राबवणाऱ्या मंडळांना तालुकास्तरावर जिल्हास्तरावर राज्यस्तरावर प्रत्येकी तीन बक्षिसे दिली जाणार आहेत.










