गणेशोत्सव मंडळांनी पोलीस परवानगी घेणे बंधनकारक – वरिष्ठ पोनि. नंदकुमार गायकवाड

नियमांचे पालन न करणाऱ्या मंडळांवर कारवाईचा इशारा; विसर्जनावेळी नदीपात्रात उतरण्यास मनाई

वाघोली : सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरी खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात गणेशोत्सव मंडळे, ढोल पथक चालक तसेच नदी विसर्जनासाठी होडी चालकांची बैठक घेण्यात आली.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पोलीस व ग्रामपंचायतीची परवानगी घेणे बंधनकारक असून, अद्याप परवानगी न घेतलेल्या मंडळांनी दोन दिवसांत आवश्यक परवानगी घ्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी केले. उत्सव काळात ध्वनिक्षेपकाची निर्धारित मर्यादा पाळावी, मिरवणुकीतील देखाव्याची उंची मर्यादित ठेवावी तसेच जेष्ठ, महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची मंडळांनी विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

तसेच गणेश विसर्जनावेळी नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये तसेच होडीत बसू नये. गणेशमूर्ती होडी चालकाकडे देऊन विसर्जनाची प्रक्रिया पार पाडावी. होडीत नागरिक आढळून आल्यास संबंधित होडी चालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा गायकवाड यांनी दिला. तसेच होडी चालकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने लाईफ जॅकेटचा वापर करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, गायकवाड यांनी नदीघाट तसेच परिसरातील रस्त्यांची पाहणी करून विसर्जनाच्या नियोजनाबाबत ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस पाटील यांना आवश्यक सूचना दिल्या. पुलावरून किंवा नदीच्या कठड्यावरून गणेशमूर्ती पाण्यात फेकू नये, तसेच निर्माल्य नदीत टाकू नये, असे आवाहनही करण्यात आले.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी स्पष्ट केले.

यावेळी पोलीस पाटील भारती उंद्रे, पोलीस कर्मचारी बाळासाहेब हराळ, सत्यवान सावंत, विठ्ठल सावंत यांच्यासह गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page