बीजेएस महाविद्यालाचा डेक्कन कॉलेज पुरातत्व संग्रहालय येथे हेरिटेज वॉक संपन्न

पुणे : भारतीय ज्ञान परंपरेचा वारसा हा दुर्मिळ वस्तूंच्या स्वरूपातून पुणे येथील डेक्कन कॉलेज पुरातत्व संग्रहालयात जतन करून ठेवलेला आहे. इनामगाव, नेवासा, जोरवे, तेर, ब्रह्मपूर, चांडोली, रंगपूर, महेश्वर, त्रिपुरी, अहारा अशा अनेक ठिकाणी झालेल्या उत्खननामध्ये मिळालेल्या दुर्मिळ वस्तूंच्या माध्यमातून मानवाच्या संस्कृतीक वाटचालीची प्रगती झाल्याचे दिसून येते आहे असे निलेश जाधव यांनी भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विभागाने आयोजित केलेल्या डेक्कन कॉलेज पुरातत्व संग्रहालय येथील हेरिटेज वॉकमध्ये मत व्यक्त केले.
डेक्कन कॉलेज पुरातत्व संग्रहालयामध्ये अश्मयुग, तांब्रपाषाणयुग आणि लोहयुगातील मानवाने वापरलेली दगडाची व धातूची हत्यारे, कुऱ्हाडी आणि तासण्या, मध्याश्मयुगीन मानवी सांगाडा, ताम्रपाषाण युगातील मातीची भांडी, जोर्वे संस्कृतीतील लहान मुलांच्या सांगाड्यांचे अवशेष, महापाषाणकाळातील दफन पद्धती, लोहयुगातील लोखंडाचे अवशेष, सातवाहनकालीन मणी, हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मातील शिल्पे, विविध मूर्ती, ब्राह्मी लिपीतील शिलालेख, हस्तलिखिते, ताम्रपट आणि मराठा इतिहास संग्रहालयातील शिवकालीन आणि पेशवेकालीन मोडी कागदपत्रे, शिवकालीन हत्यारे अशा अनेक दुर्मिळ वस्तूंची माहिती प्रा. किरण खोचरे यांनी दिली.
हेरिटेज वॉकसाठी बीजेएस प्रबंध समिती सदस्य सुरेश साळुंके, बीजेएस महाविद्यालयाचे सीईओ डॉ. रविंद्रसिंह परदेशी, प्राचार्या डॉ. मनिषा बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भूषण फडतरे, डॉ. सचिन कांबळे, प्रा. किरण खोचरे, प्रा. शशीकांत रणसिंग यांनी हेरिटेज वॉकचे नियोजन केले.










