वाघोली, लोहगावच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्या
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन; बायपास, रस्ते, ड्रेनेजसह विविध कामांना गती देण्याची मागणी
वाघोली : वाघोली व लोहगावसह नव्याने समाविष्ट गावांतील विविध महत्त्वाच्या विकासकामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देत कामांना प्रशासकीय मंजुरी द्यावी, अशी मागणी नगरसेवक रामभाऊ दाभाडे, अनिल सातव पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाघोलीतील वाहतूक कोंडी, लोहगावमधील रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, पाणीपुरवठा तसेच नव्याने समाविष्ट गावांतील मालमत्ता कर यांसह विविध प्रश्नांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.
वाघोलीतील नगररोडवरील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दोन पर्यायी बायपास रस्त्यांच्या भूसंपादन व मोजमापाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये खांदवे नगर ते बकोरी फाटा हा ५.७ किलोमीटरचा पर्यायी आरपी रस्ता तसेच उबाळे नगर ते काटकेवाडी हा ८.३ किलोमीटरचा पर्यायी रस्ता प्रस्तावित असून, या दोन्ही रस्त्यांसाठी तसेच भूसंपादनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील नागरिकांवरील मालमत्ता कराचा बोजा कमी करावा, अशी मागणीही करण्यात आली. तसेच लोहगावमधील पाणीपुरवठा व ड्रेनेजची सुमारे ९० टक्के कामे पूर्ण झाल्याने अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे लोहगावच्या अंतर्गत रस्त्यांसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली.
लोहगावमधील प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठीही ४६ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये लोहगाव बस स्टॉप–संतनगर, डायमंड वॉटर पार्क रोड, पवार वस्ती–वडगाव शिंदे रोड, लोहगाव बस स्टॉप–वडगाव शिंदे रोड तसेच वाघमारे चौक–४ नंबर खान रस्ता या प्रमुख मार्गांचा समावेश आहे.
दरम्यान, वाघोलीच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ड्रेनेजची सुविधा अपुरी पडत असल्याने २७३ कोटी रुपयांचा ड्रेनेज मास्टर प्लॅन राबविण्याची मागणी करण्यात आली. तसेच वाघोलीचा अमृत-२ योजनेत समावेश करण्याची मागणीही केंद्रीय राज्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. वाघोली–भावडी रोड तसेच परिसरातील अंतर्गत रस्त्यांसाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली.
वाघोली व लोहगावच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी तसेच प्रशासकीय मंजुरी तातडीने उपलब्ध करून देऊन प्रलंबित विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
» मोहोळ यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद
विविध विकासकामांबाबतचे पत्र स्वीकारल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लोहगाव, वाघोलीसह नव्याने समाविष्ट गावांच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे परिसरातील प्रलंबित विकासकामांना गती मिळणार आहे.










