दोन्ही पाय बांधून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून केली हत्या
मांजरी खुर्द येथील घटना

वाघोली : मांजरी खुर्द परिसरात एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणाचे दोन्ही पाय दोरीने बांधून डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून त्याचा खून करण्यात आला आहे. व्हीटीपी आणि गेरा कन्स्ट्रक्शनच्या बांधकाम साईटदरम्यान नदीकाठच्या झाडीझुडपात हा मृतदेह आढळला. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. व्हीटीपी आणि गेरा कन्स्ट्रक्शन या दोन बांधकाम साईटच्या मधोमध असलेल्या झाडीझुडपात एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, सुमारे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळून आला. तरुणाचे दोन्ही पाय दोरीने बांधलेले होते. तसेच डोक्यात सिमेंटचा सिपोरेक्स ब्लॉक घालून त्याची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
मृत तरुणाच्या अंगात फिकट गुलाबी रंगाचा फुल शर्ट असून त्याने निळ्या रंगाचे जॅकेट व पॅन्ट, काळ्या रंगाचा बेल्ट आणि विटकरी रंगाची चप्पल परिधान केली होती. तसेच त्याच्या जवळ आकाशी रंगाचे वायरलेस हेडफोन आढळून आले आहेत. या वर्णनाच्या आधारे मृत तरुणाची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
याप्रकरणी पोलीस अंमलदार दीपक कोकरे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणाची हत्या नेमकी कोणत्या कारणातून आणि कोणी केली, याचा तपास पोलीस करीत आहेत.
कपाटात ठेवलेले दागिने, रोख रकमेची चोरी
वाघोली : किचनकडील बेडरूमच्या दरवाजाचा तोडून त्याद्वारे घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली ७० हजारांची रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने असा १ लाख २४ हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना पेरणे कदमवस्ती येथे घडली असून याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना ६ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर पहाटे पाच दरम्यान घडली. याबाबत काळूराम टूले यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाघोलीसह परिसरात ५ ठिकाणी आगीच्या घटना
वाघोली : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाघोली आणि परिसरात विविध ठिकाणी आग लागण्याच्या ५ घटना घडल्या. आगीची माहिती मिळताच वाघोली पीएमआरडीएअग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
बकोरी फाटा वाघोली येथे गाडीला आग लागल्याची घटना रात्री ८ च्या सुमारास घडली. कोलवडी गाव थेऊर लोणीकंद रोड येथे भंगाराच्या गोडाऊन आग लागल्याची घटना साडे आठच्या सुमारास घडली. बकोरी रोड बीजेएस कॉलेज येथे कचऱ्याला आग लागल्याची घटना सव्वा नऊच्या सुमारास घडली. केसनंद गाव येथे चौथ्या मजल्यावरती फ्लॅटला आग लागल्याची घटना दहाच्या सुमार घडली. मांजरी येथे उसाला आग लागल्याची घटना सव्वा दहाच्या सुमारास घडली.










