सासरच्यांकडून झालेल्या मारहाणीत जावयाचा मृत्यू

लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल; दोघांना अटक

वाघोली : पत्नीला शोधण्यासाठी सासरी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण केल्याने मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना कोलवडी येथे सोमवारी (दि.९) साडे आठच्या सुमारास घडली. मारहाणीनंतर त्यास दवाखान्यात नेल्यानंतर दुचाकीवरून पडल्याने सासरच्यांनी सांगितले. मात्र पोलीस तपासात त्याचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

सुलतान सादीक शेख (वय २४, रा. कोंढवा) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी रहीम मोहम्मद शेख (वय ६५) आणि अमर रहीम शेख (वय ४५, दोघे रा. चौफुला कोलवडी) यांना अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुलतान शेख हा रिक्षाचालक होता. त्याचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाले होते. त्यानंतर सुलतानची पत्नी आई-वडिलांसोबत माहेरी गेली होती. पत्नीचा शोध घेत सुलतान ९ नोव्हेंबरच्या रात्री कोलवडी येथील सासरी पोहोचला. यावेळी आजे सासरे रहीम शेख आणि सासरे अमर शेख यांनी त्याला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली.

घटनेनंतर सासरच्यांनी सुलतानला रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यावेळी सुलतानचा दुचाकीवरून पडून अपघात झाल्याने मृत्यू झाल्याचे सासरच्यांकडून सांगितले गेले. मात्र, या घटनेबाबत संशय निर्माण झाल्याने लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सुलतानचा अपघात झाल्याचे सांगितलेल्या ठिकाणी दुचाकी पडलेली नव्हती किंवा अपघात झाल्याच्या कोणत्याही खुणा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपितांनी सुलतानला मारहाण केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी खुनासाठी वापरण्यात आलेले लाकडी दांडके जप्त केले असून, दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी सुलतानचा भाऊ साबीर सादिक शेख याने फिर्याद दिली आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page