रेकॉर्डवरील सराईत साथीदारासह जेरबंद
वाघोली पोलिस तपास पथकाची कारवाई; दोन कोयते जप्त
वाघोली : दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला वाघोली पोलिसांच्या हद्दीतील सराईत पुन्हा हद्दीत सक्रिय झाल्याने वाघोली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने त्याला व त्याच्या साथीदाराला कोयत्यासह जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून दोन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले असून याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाळवाडी रोडवरील गारवा हॉटेलसमोर दोन तरुण हातात कोयते घेऊन फिरत आहेत आणि परिसरात दहशत माजवत आहेत, अशी माहिती वाघोली पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यामध्ये ओम दादाराव म्हस्के (वय २१, रा. वाघोली) हा निष्पन्न झाला. तो पोलीस रेकॉर्डवरील सराईत असून, त्याच्यावर वाघोली व लोणीकंद पोलीस ठाण्यात तब्बल ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. एवढेच नव्हे तर त्याच्यावर यापूर्वी ‘एमपीडीए’ (MPDA) अंतर्गतही कारवाई करण्यात आलेली आहे. गुन्हेगारी कारवाया वाढल्याने पोलीस उपायुक्त परिमंडळ ७ यांनी ऑगस्ट २०२६ मध्ये आदेश काढून ओम म्हस्के याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. मात्र, तो विनापरवाना व अनाधिकृतपणे वावरत होता.
म्हस्के याच्यासोबत त्याचा साथीदार अथर्व दत्तात्रय येवले (वय १९, वाघोली) हा देखील पोलिसांच्या हाती लागला आहे. अथर्व येवले याच्यावरही पुर्वी आर्म कायद्यान्वये गुन्हा नोंद असल्याचे समोर आले आहे. अंगझडतीदरम्यान त्यांच्याकडे दोन लोखंडी कोयते मिळून आले. या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त अबिनाश कुमार, सहा. पोलीस आयुक्त अनिता मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप (गुन्हे), पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघु, बाळासाहेब मोराळे, ऋषीकेश व्यवहारे, योगेश शिंदे, अमोल घावटे, अशोक शेळके, पांडुरंग माने, समीर भोरडे, राहुल गोरे, अमोल सरतापे, महादेव कुंभार, मारुती वाघमारे विशाल गायकवाड, गहिनीनाथ बोयणे यांनी केली आहे.










