वढू-पेरणे बंधाऱ्यांत तातडीने पाणी सोडण्याची मागणी

वाघोलीसह भीमा नदीकाठच्या गावांच्या पाणीप्रश्नावर आमदार कटके आक्रमक

वाघोली :  शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील वाघोली पंचक्रोशी आणि परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार ज्ञानेश्वर (आबा) कटके यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. वढू आणि पेरणे येथील बंधाऱ्यांमधील पाणीसाठा आटल्यामुळे परिसरातील प्रादेशिक व स्थानिक पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या असून, सुमारे एक लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कटके यांनी जिल्हाधिकारी तसेच राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र देऊन वडू व पेरणे बंधाऱ्यांमध्ये तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे.

वाघोली आणि परिसरातील नागरिकांना सध्या पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक असलेला पाणीसाठा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. या परिस्थितीत प्रशासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजनांपुरते मर्यादित न राहता पाणी उपलब्धतेचे तातडीने नियोजन करणे आवश्यक असल्याचे आमदार कटके यांनी पत्रात नमूद केले आहे.

भीमा नदीवरील पाणीसाठा हा केवळ वाघोलीपुरता मर्यादित विषय नसून नदीकाठच्या अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याशी, शेतीच्या सिंचनाशी आणि पशुधनाच्या पाण्याच्या गरजांशी संबंधित आहे. नदीतील पाण्याची पातळी खालावल्याने या सर्व घटकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंधाऱ्यांमधील पाण्याचे नियोजन करताना एका गावापुरता विचार न करता नदीकाठच्या सर्व संबंधित गावांच्या गरजा, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आणि उपलब्ध जलसाठ्याचा समतोल वापर या बाबींचा विचार करावा, अशी भूमिका आमदार कटके यांनी मांडली आहे.

जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाने या विषयात स्वतः लक्ष घालून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना द्याव्यात. उपलब्ध पाणीसाठा, पाणी सोडण्याचे वेळापत्रक आणि विविध गावांच्या गरजा यांचा समन्वय साधून पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पिण्याचे पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. वाघोलीसह भीमा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणे ही गंभीर बाब आहे. पाण्याच्या उपलब्धतेचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य मिळाले पाहिजे. शेती आणि पशुधनाच्या गरजांचाही विचार करून उपलब्ध जलसाठ्याचा समन्यायी व नियोजनबद्ध वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे वडू व पेरणे बंधाऱ्यांमध्ये तातडीने पाणी सोडण्याबाबत संबंधित विभागांनी कार्यवाही करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, यासाठी जिल्हाधिकारी व जलसंपदामंत्र्यांकडे मागणी केली आहे.

– ज्ञानेश्वर (आबा) कटके  (आमदार, शिरूर-हवेली)

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page