पैनगंगा नदी कोरडीठाक

सवना परिसरात दुष्काळाचे भीषण सावट; हिवाळी पिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; वन्यजीवांसह अंत्यविधीनंतरच्या धार्मिक विधींनाही अडचणी

हिंगोली : (अमोल नायक) सेनगाव तालुक्यातील सवना परिसरासह मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. अल्प पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीचे पात्र कोरडेठाक पडले असून, नदीपात्राचे वाळवंटात रूपांतर झाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, आगामी काळात वन्यजीवांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यातून होत असून, ही नदी मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरून वाहत इसापूर धरणाला जाऊन मिळते. या नदीवर काही वर्षांपूर्वी विविध ठिकाणी बॅरेज उभारण्यात आले होते. दरवर्षी पावसाळ्यानंतर या नदीत मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असते. या पाण्याचा उपयोग नदीच्या दोन्ही काठांवरील शेतकऱ्यांना हिवाळी पिकांसाठी होत असतो. मात्र, यंदा झालेल्या अल्प पावसामुळे नदीवरील काही बॅरेज कोरडे पडले आहेत, तर काही ठिकाणी अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे.

पैनगंगा नदीच्या पाण्यावर परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. रब्बी हंगामात पिकांना पाणी देण्यासाठी नदीतील पाणीसाठा महत्त्वाचा ठरतो. मात्र, यंदा नदीपात्रातच पाणी नसल्याने आगामी हिवाळी हंगामात पिकांना पाणी कसे उपलब्ध करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. पावसाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एकूणच, पैनगंगा नदीचे कोरडे पडलेले पात्र हे परिसरातील पाणीटंचाईचे गंभीर संकेत देत आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे नियोजन, पाणीटंचाईवरील उपाययोजना आणि आगामी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

» वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न 

नदीपात्र कोरडे पडल्याचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित राहणार नसून, परिसरातील वन्यजीवांनाही त्याचा फटका बसणार आहे. नदीतील पाणी आटल्याने वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

» दशक्रिया विधीसाठीही अडचणी 

पैनगंगा नदीला या परिसरातील नागरिकांच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनातही महत्त्वाचे स्थान आहे. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर दशक्रिया विधी करण्यासाठी मृत व्यक्तीचे नातेवाईक याच नदीपात्रावर येतात. मात्र, नदी कोरडी पडल्याने धार्मिक विधी पार पाडताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा परिणाम शेती, वन्यजीव आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनासोबतच पारंपरिक धार्मिक विधींवरही होत असल्याचे चित्र आहे.

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page