वाघोलीत घरफोड्या करणारा जेरबंद
वाघोली तपास पथकाची कामगिरी; ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त; चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस, लोहगावमधील एका गुन्ह्याचाही समावेश
वाघोली : वाघोली परिसरात दुकानांचे पत्रे उचकटून आत प्रवेश करत घरफोड्या करणाऱ्या आरोपीला वाघोली पोलीस तपास पथकाने अटक केली आहे. एकूण चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
तेजस विष्णू मेंढके (वय ३२, रा. गायरान, गोरे वस्ती, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाघोली पोलीस तपास पथक मंगळवारी (दि. ६ सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे आणि योगेश शिंदे यांना दुकानांचे पत्रे उचकटून घरफोड्या करणारा संशयित आरोपी गायरान, गोरे वस्ती परिसरात असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार त्याला राहत्या घरातून पथकाने ताब्यात घेतले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याची पटवली असता त्याचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हे केल्याची कबुली दिली.
घरफोडी गुन्ह्यात चोरी गेलेल्या मालापैकी मोबाईल. रोख रक्कम, पॉलीकॅब वायर असा एकूण ९६ हजार ६७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्याच्याकडून वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घराफोड्या आणि लोहगावमधील एक घरफोडी उघडकीस आणण्यात तपास पथकाला यश मिळाले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त अबिनाश कुमार, सहा. पोलीस आयुक्त अनिता मोरे, यांचे मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर (गुन्हे), पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघु, सपोफौ बाळासाहेब मोराळे, पोशि महादेव कुंभार, पोशि विशाल गायकवाड, पोशि पांडुरंग माने, पोशि मारुती वाघमारे, पोशि अशोक शेळके, पोशि ऋषीकेश व्यवहारे पोशि समिर भोरडे, पोशि योगेश शिंदे, पोशि आमेल घावटे, पोशि राहुल गोरे पोशि अमोल सरतापे, पोशि गहिणीनाथ बायने यांनी केली आहे.
वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणाऱ्या घरफोड्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे.
– नंदकुमार गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाघोली)










