खून, खंडणीसह विविध गुन्ह्यांतील पाचजण पुणे जिल्ह्यातून हद्दपार
लोणीकंद पोलिसांची कारवाई

वाघोली : खून व खंडणीसह विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील पाच आरोपींच्या टोळीवर पोलिसांनी तडीपारची कारवाई केली आहे. या पाचही आरोपींना एक वर्षासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
सचिन किसन शिंदे (वय ३९, रा. शिंदेवस्ती, लोणीकंद), हर्षद कुमार शिंदे (वय २४), अजिंक्य दादासाहेब म्हस्कुटे (वय २७, रा. खामगाव, ता. दौंड), संतोष गोविंद जाधव (वय १८, रा. लोणीकंद), प्रकाश बाबुराव शिवभक्ते (वय २५, रा. खडकआळी, लोणीकंद) असे तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील या आरोपींच्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याने त्यांच्याविरुद्ध तडीपार कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित प्राधिकरणाच्या आदेशानंतर पाचही आरोपींना पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.
सदरील कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कागणे, पोना जी. डी. दळवी, पोअं एस. डी. सातव, मपोअं जे. एस. कुटे, पोह जया थिटे, नवनाथ शिंदे यांनी केली आहे.
गुन्हेगारी कारवायांना थारा दिला जाणार नाही. खून, खंडणी तसेच इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी गुन्हेगारांविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई यापुढेही सुरूच राहील.
– सुनिता रोकडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद)










