राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत एमजीएम कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन संचलित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) पथकाच्या वतीने “राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा” आणि “जागतिक साक्षरता दिवस” या निमित्ताने विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रासेयो स्वयंसेवकांनी विविध विषयांवर प्रभावी सादरीकरण केले.
नेत्रदानाचे महत्त्व अधोरेखित करताना सिद्धी बेद्रे हिने नेत्रदान का आणि केव्हा करावे, यासोबतच समाजमन दूषित करणाऱ्या विविध गैरसमजांचे निरसन केले. त्यानंतर सुकेशिनी सोनावणे व रुपाली राऊत यांनी जागतिक साक्षरता दिनाचे महत्त्व आणि साक्षरतेचा समाजावर होणारा परिणाम याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच भूमी देशमुख व श्रुतिका देशमुख यांनी उपस्थितांना “विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग-२०२७” या स्पर्धेविषयी सविस्तर माहिती देऊन स्वयंसेवकांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्राविका शेटे हिने केले, तर प्रमोद पवार, ऋषिकेश मुसळे, अनिसखाँ पठाण आणि हर्शल आढाव यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे व उत्कृष्ट सादरीकरणाचे एमजीएमचे शैक्षणिक संचालक डॉ. कपा सर्जन राव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्रसिंग चव्हाण यांनी अभिनंदन केले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक खर्डे व डॉ. सोनम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो स्वयंसेवकांद्वारे करण्यात आले.










