वाघोलीतील ओझोन अपार्टमेंटचा पाणीप्रश्न अखेर सुटला
पुणे पालिकेकडून नियमित पाणीपुरवठा सुरू

वाघोली : लोहगाव रोड, वाघोली येथील ‘ओझोन अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’मध्ये अनेक दिवसांपासून विस्कळीत झालेला पिण्याच्या व दैनंदिन वापराच्या पाण्याचा प्रश्न अखेर सुटला आहे. शिरूर-हवेलीचे विधानसभा सदस्य ज्ञानेश्वर आबा कटके यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे पुणे महानगरपालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाने तातडीने पावले उचलून या समस्येचे निवारण केले आहे.
आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी सोसायटीतील पाण्याच्या समस्येबाबत प्रत्यक्ष जागेची पाहणी करून प्रशासनाला आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ओझोन अपार्टमेंटला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
प्रशासनाने तांत्रिक अडचणी दूर करत पाणीपुरवठा पूर्ववत केला असून, सध्याच्या स्थितीत या सोसायटीला पुरेसा व नियमित दाबाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यामुळे ओझोन अपार्टमेंटमधील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर सुरळीत पाणीपुरवठा सुरु झाल्याचे सांगितले.










