ट्रेलर चालकाला धमकावून १० हजार ५०० रुपये उकळले
प्रत्येक गाडीमागे पाच हजारांची मागणी; वाघोलीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वाघोली : बांधकाम साईटवर स्टीलचा माल खाली करण्यासाठी आलेल्या ट्रेलर चालकाला धमकावून त्याच्याकडून १० हजार ५०० रुपये जबरदस्तीने घेतल्याची घटना वाघोलीतील गेरा आयओजे कन्स्ट्रक्शन साईटवर घडली. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी नवनाथ रिकामे (रा. आव्हाळवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
याबाबत विठ्ठल गर्जे (रा. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. गर्जे हे नाथकृपा रोडलाईन अँड स्टील सप्लायर्स या कंपनीत ट्रेलर चालक म्हणून कार्यरत आहेत. फिर्यादीनुसार, ऑगस्ट महिन्यात स्टीलचा माल घेऊन ते गेरा आयओजे येथील बांधकाम साईटवर गेले होते. त्यावेळी आरोपी नवनाथ रिकामे याने आपण या परिसरातील भाई असून गुंडांशी ओळख असल्याचे सांगत प्रत्येक गाडीमागे पाच हजार रुपये देण्याची मागणी केली. भीतीपोटी गर्जे यांनी आरोपीला दोन वेळा प्रत्येकी पाच हजार रुपये दिले होते.
त्यानंतर १० सप्टेंबर रोजी गर्जे हे ६७ टन स्टील घेऊन पुन्हा साईटवर गेले. त्यावेळी आरोपीने पुन्हा पाच हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने गर्जे यांना चापट मारून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पैसे न दिल्यास स्टीलचा माल खाली करू देणार नसल्याचे सांगितले.
यानंतर आरोपीने गर्जे यांच्याकडील १० हजार ५०० रुपये जबरदस्तीने घेतले आणि दुचाकीवरून तेथून निघून गेला. घटनेनंतर गर्जे यांनी कंपनीच्या मालकाला प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.










