मांजरी खु. येथे बिबट्याचा वावर
गोठ्यातील वासराचा पाडला फडशा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; पिंजरा लावण्याची मागणी

वाघोली : मांजरी खु. परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, शुक्रवारी मध्यरात्री माणिकनगर परिसरात बिबट्याने गोठ्यात शिरून गायच्या वासरावर हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
माणिकनगर येथील शेतकरी दत्तात्रय त्रिंबक उंद्रे यांच्या गट क्रमांक ९४३ मध्ये घराशेजारी गोठा आहे. या गोठ्यात गाई, वासरू व इतर जनावरे बांधण्यात आली होती. गोठ्याभोवती कंपाऊंड असतानाही बिबट्याने कंपाऊंडमध्ये प्रवेश करून बांधलेल्या वासरावर हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला.
दररोजच्या वेळेनुसार शुक्रवारी सकाळी दत्तात्रय उंद्रे गाईची धार काढण्यासाठी गोठ्यात गेले असता त्यांना वासरू मृतावस्थेत आढळून आले. बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता लक्षात आल्यानंतर माजी सरपंच स्वप्निल उंद्रे यांनी वनविभागाचे कर्मचारी ज्ञानेश्वर शिवले यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच शिवले यांनी घटनास्थळी धाव घेत मृत वासराचा पंचनामा केला. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
» रात्री शेतात जाणे टाळण्याचे आवाहन
वन कर्मचारी ज्ञानेश्वर शिवले यांनी शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले. “शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाऊ नये. शक्यतो दोघांनी किंवा समूहाने शेतात जावे. रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कोलवडी आणि मांजरी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वीही पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जायचे तरी कसे?” असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
मांजरी खुर्द परिसरातील बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी माजी सरपंच स्वप्निल उंद्रे व पंडित उंद्रे यांनी केली आहे.










