गार्गीच्या उपचारासाठी केतन भैय्या जाधव यांचा पुढाकार
महाआरोग्य शिबिराऐवजी वाढदिवसाचा खर्च चिमुकलीच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय

वाघोली : लोकसेवा परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व वाघोलीतील सामाजिक कार्यकर्ते केतन भैय्या जाधव दरवर्षी वाढदिवसानिमित्त (१५ सप्टेंबर) महा शिबिराचे आयोजन करतात. मात्र यावर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिरावर होणारा खर्च टाळून एसएमए (SMA) या दुर्मिळ व गंभीर आजाराशी लढा देणाऱ्या चिमुकली ‘गार्गी जाधव’ हिच्या उपचारासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
चिमुकल्या गार्गीवर गंभीर आजारासाठी उपचार सुरू असून तिच्या उपचारासाठी तब्बल १० कोटी रुपयांच्या अत्यंत महागड्या इंजेक्शनची गरज आहे. सामान्य कुटुंबातील गार्गीच्या पालकांसाठी एवढी मोठी रक्कम उभी करणे अशक्यप्राय असल्याने तिला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. सोशल मीडियावरून गार्गीच्या मदतीसाठी सुरू असलेले आवाहन पाहून जाधव यांनी हा अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे.
यंदा आरोग्य शिबिराचा खर्च टाळून ‘फुल ना फुलाची पाकळी’ म्हणून गार्गीला मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा, पुष्पगुच्छ किंवा हारांवर होणारा अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे गार्गीच्या उपचारासाठी द्यावी. सर्वांच्या छोट्या-छोट्या मदतीतूनच गार्गीचा जीव वाचू शकतो, त्यामुळे समाजातील दानशूर नागरिकाने सढळ हाताने मदत करावी असे आवाहन जाधव यांनी सहकाऱ्यांना व नागरिकांना केले आहे.
दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू नागरिकांना आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न करतो. मात्र यंदा गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या चिमुकली गार्गीच्या उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज असल्याने आरोग्य शिबिराचा खर्च टाळून तिच्या उपचारासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. छोट्याशा मदतीतून गार्गीला नवजीवन मिळू शकते. – केतन भैय्या जाधव (संस्थापक-अध्यक्ष, लोकसेवा परिवर्तन फाउंडेशन)










