बेशिस्त प्रवासी रिक्षाचालकांची मनमानी

पोलिसांची बघ्याची भूमिका; आव्हाळवाडी फाट्यावर बेशिस्त रिक्षाचालकांमुळे कोंडीसह अपघाताला निमंत्रण

वाघोली : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर वाघोलीतील आव्हाळवाडी फाटा येथे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, महामार्गावरील या चौकात वाहतूक पोलिसांच्या समोरच रिक्षाचालकांकडून नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. रिक्षा रस्त्याच्या मध्यभागी उभ्या करून प्रवासी घेण्याच्या प्रकारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, अपघाताचा निमंत्रण मिळत आहे. संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत आव्हाळवाडी फाट्यावर रिक्षांची रस्त्याच्या मध्यभागीच रांग लागते. वाहतूक पोलीस चौकात वाहतूक नियमन करत असतानाही काही रिक्षाचालक बिनधास्तपणे प्रवासी चढ-उतार करत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होत आहे.

या चौकाला लागूनच आठवडी बाजार भरत असल्याने बाजाराच्या दिवशी परिस्थिती आणखी बिकट होते. पुणे–नगर महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असताना प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षा बेशिस्तपणे उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठी कसरत करत जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

दरम्यान, आव्हाळवाडी फाटा, केसनंद फाटा, लोहगाव–वाघोली रस्त्यावरील वाघेश्वर चौक आणि बकोरी फाटा या ठिकाणीही अशाच प्रकारे बेशिस्त प्रवासी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे केसनंद फाटा येथे पोलीस ठाण्याच्या परिसरातच नियमबाह्य प्रवासी वाहतूक होत असल्याने पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आली आहे.

नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. “वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीतच नियमांचे उल्लंघन होत असेल, तर कायद्याचा धाक कसा राहणार?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर सातत्याने कारवाई होत नसल्याने आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. वाहतूक कोंडी, बेकायदा प्रवासी वाहतूक आणि उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर सातत्याने कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

यासोबतच जड व अवजड वाहनांकडूनही वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अपघातांचे प्रमाण वाढत असताना हा महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे.

दोन दिवसांपूर्वीच भरधाव टेम्पोने ३८ वर्षीय महिलेला धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. महामार्गावर सातत्याने अपघात होत असतानाही पोलीस आणि परिवहन विभागाकडून प्रभावी व ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. वाघोली वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क केला वरून मशीन बंद असल्यामुळे कारवाई करता येत नाही. दोन दिवसांपासून पुण्यात बंदोबस्तला आहे. उद्या आल्यावर बघू असे सांगितले.

» रोजच्या कोंडीसाठीही आखावा ‘अॅक्शन प्लॅन’ 

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक व्यवस्थापन करून पुणे–अहिल्यानगर महामार्गावर होणारी मोठी वाहतूक कोंडी सोडवण्यास यश मिळवले. मिरवणुकीचा मार्ग बदलणे, विविध विभागांशी समन्वय साधणे आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती करणे यामुळे यंदा मागील वर्षाच्या तुलनेत वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला नाही. त्यामुळे समाजमाध्यमातून त्यांचे अभिनंदन व कौतुकही झाले. नागरिकांनी पोलिसांचा सन्मान देखील केला. परंतु विसर्जन मिरवणुकीसाठी जसे विशेष नियोजन करण्यात आले, त्याच धर्तीवर वाघोलीतील दररोजची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीही पोलिसांनी कायमस्वरूपी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page