वनार्टीतील कथित निविदा अनियमिततेची स्वतंत्र चौकशी करा
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती सचिव रमेश पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी

पुणे : वंचित, दुर्बल व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या वनार्टी (VANARTI) संस्थेतील अभ्यासिका व कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित कामांच्या निविदा प्रक्रियेत कथित अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार तसेच हितसंबंधांचा संभाव्य संघर्ष असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा समन्वय सचिव रमेश अर्जुन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
वनार्टी येथे अभ्यासिका व कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित कामांच्या वाटपामध्ये निविदा प्रक्रियेचे पालन, आर्थिक अनियमितता तसेच हितसंबंधांचा संभाव्य संघर्ष याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वनार्टीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य वित्त व लेखाधिकारी प्रशांत वावगे यांनी नियमित निविदा प्रक्रिया राबविली नसल्याचा आरोप समितीने केला आहे.
याशिवाय, नागपूर येथील इग्नाइट अकॅडमी (Ignite Academy) आणि आकार फाउंडेशन यांना सार्वजनिक निविदा प्रक्रिया अथवा जाहिरात न करता अभ्यासिका व कौशल्य प्रशिक्षणाची कामे देण्यात आल्याची माहिती समोर आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या कामांची पात्रता, अनुभव, निवड प्रक्रिया, काम वाटपाची पद्धत, प्रशासकीय मंजुरी तसेच आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय नागपूर, संभाजीनगर येथील अभ्यासिकांसाठी प्रति विद्यार्थी सुमारे १००० प्रति महिना या दरात सुविधा उपलब्ध असताना प्रति विद्यार्थी सुमारे ३००० प्रति महिना या दराने (Ignite Academy) अकॅडमी व आकार फाउंडेशन या संस्थांना काम देण्यात आले आहे.यामध्ये शासनाच्या निधीचा गैरवापर झाला आहे किंवा नाही. तसेच आर्थिक अनियमितता झाली आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशांत वावगे हे मागील काही वर्षांपासून महाज्योतीमध्ये मुख्य वित्त व लेखाधिकारी तसेच वेळोवेळी अतिरिक्त कार्यभारावर व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर वनार्टीचे व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य वित्त व लेखाधिकारी या दोन्ही महत्त्वाच्या पदांचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे एका अधिकाऱ्याकडे दोन संस्थांतील महत्त्वाची पदे कोणत्या प्रशासकीय व कायदेशीर आधारावर देण्यात आली, याचीही चौकशी करण्याची मागणी समितीने केली आहे.
दरम्यान, प्रशांत वावगे यांच्या पत्नी मागील तीन वर्षांपासून महाज्योतीमध्ये लेखाधिकारी म्हणून कार्यरत असून वनार्टीमध्येही लेखाधिकारी पदावर कार्यरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित संस्थांमधील संभाव्य हितसंबंधांबाबत साशंकतेला वाव आहे. महाज्योतीमध्ये दीर्घकालीन लेखाधिकारी म्हणून ठाण मांडून आहेत. याप्रकरणी पारदर्शक व निष्पक्षपाती चौकशी करण्याची मागणी समितीने केली आहे.
राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज यांचेशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
» एमपीएससी समन्वय समितीच्या प्रमुख मागण्या
वनार्टीतील अभ्यासिका व कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित सर्व निविदा प्रक्रिया, निविदा जाहिराती, प्रशासकीय मंजुरी, करार, आर्थिक व्यवहार व देयकांची सखोल चौकशी करावी. तसेच इग्नाइट अकॅडमी (Ignite Academy) व आकार फाउंडेशनची पात्रता, अनुभव, निवड प्रक्रिया व काम वाटपाची तपासणी करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
» निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होणे आवश्यक
प्रशांत वावगे व संबंधित संस्था अथवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार, हितसंबंध किंवा अन्य संबंध आहेत का, याची चौकशी करावी. चौकशी निष्पक्ष व पारदर्शक होण्यासाठी प्रशांत वावगे यांना संबंधित पदावरील प्रशासकीय कामकाजापासून दूर ठेवावे, तसेच चौकशीमध्ये अनियमितता किंवा नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार शिस्तभंगात्मक व प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
» वनार्टीमधील पदांवरून बदलीची मागणी
‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे व त्यांच्या पत्नी यांची महाज्योती व वनार्टीमधील पदांवरून बदली करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व वेळेत चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी अपेक्षा स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांनी व्यक्त केली आहे.










