वाघोली-भावडी रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन
मनपा अधिकाऱ्यांचे पुतळे खड्ड्यांतून ओढले!; वारंवार तक्रारी करूनही दखल घेत नसल्याचा सुभाष जाधवर यांचा आरोप
वाघोली : वाघोली-भावडी रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या गंभीर बनली असून, धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार फोन, निवेदने आणि संदेश पाठवूनही महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजविण्यासाठी कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सुभाष जाधवर यांनी गुरुवारी (दि. १५ ऑक्टोबर) अनोखे आंदोलन केले. त्यांनी महापालिकेच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांचे पुतळे तयार करून ते याच खड्ड्यांतून ओढत नेत प्रशासनाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला.
वाघोली-भावडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, वाहनांच्या वर्दळीमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार आणि त्वचेच्या विकारांचा त्रास होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः या रस्त्यावरून शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, धुळीमुळे त्यांचे गणवेश खराब होत आहेत. वाघोलीतील चार नंबर परिसरापासून पाच नंबर परिसरापर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते हिरामण वाघमारे, बापू हांडगर, सोमनाथ तांबे, गणेश पवार, अमित दळवी, अमोल बोरकर, विष्णू बोरकर, बालाजी घुगे, नागेश जगताप, किशोर जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
वाघोली-भावडी रस्त्यावरील खड्डे आणि धुळीमुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसेल, तर ही दुर्दैवी बाब आहे. महापालिकेने तातडीने खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा. – हिरामण वाघमारे (सामाजिक कार्यकर्ते)










