खराडी–केशवनगर पूल १५ दिवसांनी वाहतुकीसाठी खुला होणार
महापालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आवाहन

पुणे : खराडी–केशवनगर नदीवरील पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, अप्रोच रस्ता व इतर अनुषंगिक कामे पूर्ण झाल्यानंतरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेने जाहीर प्रकटनाद्वारे दिली आहे. तसेच काही राजकीय संघटनांकडून १ ऑगस्ट २०२६ रोजी हा पूल परस्पर वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याच्या सोशल मीडियावरील चर्चांबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, खराडी–केशवनगर नदीवरील पूल सुरू झाल्यानंतर खराडी, नगर रोड, केशवनगर, मुंढवा, मांजरी आणि हडपसर परिसरातील नागरिकांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुलभ होणार आहे. मात्र, पुलाच्या २४ मीटर अप्रोच रस्त्यावरील युटिलिटी हटविण्याचे काम सध्या सुरू असून, रस्त्यात येणारी वृक्षे काढण्यासाठी आवश्यक मंजुरी घेण्यात आली आहे. त्यानुसार वृक्ष हटविण्याचे कामही सुरू आहे.
याशिवाय काही ठिकाणची जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, अप्रोच रस्त्याचे डांबरीकरण आणि इतर पूरक कामे अद्याप पूर्ण व्हायची आहेत. अशा स्थितीत पूल वाहतुकीसाठी खुला केल्यास अपघाताची शक्यता नाकारता येणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या म्हणण्यानुसार, वृक्ष हटविणे व अप्रोच रस्त्याची उर्वरित कामे पुढील सुमारे १५ दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतरच सर्व सुरक्षा उपायांची पूर्तता करून पूल नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
दरम्यान, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि.) यांनी नागरिकांना संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, अपूर्ण अवस्थेत पूल वापरणे टाळावे, असेही नमूद करण्यात आले आहे.










