बिल्डर विरोधात पोलिसात लेखी तक्रार

वाघोलीतील गगन अदीरा सोसायटीमधील फ्लॅट धारकांची संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; सोयी सुविधा दिल्या नसल्याचा आरोप

वाघोली : अनेक फ्लॅटधारकांना पार्किंग दिले नाही, पुरेशा अॅमेनिटीज सुविधा दिल्या नसल्याचा आरोप करीत बिल्डर (भागीदार), सेल्स टीम व संबंधितांनी वाघोली येथील गगन अदीरा सोसायटीतील फ्लॅट धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी फ्लॅट धारकांनी लेखी तक्रार अर्जाद्वारे लोणीकंद पोलिसांकडे केली आहे.

पुणे-नगर महामार्गावरील लेक्सीकॉन स्कूल समोरील गगन अदिरा सोसायटी मध्ये जवळपास अडीचशेहून अधिक सदनिका आहेत. मात्र त्यातील अनेक जणांना बिल्डरकडून पार्किंग स्पेस देण्यात आली नाही. सदनिका घेतेवेळी जवळपास ४० सुविधा दिल्या जातील असे सांगितले होते. सुविधा मात्र केवळ थोडक्याच दिल्या गेल्या आहेत. पार्किंग, सुरक्षा व इतर सुविधा बिल्डरकडून दिल्या गेल्या नाहीत अशा अनेक तक्रारी लेखी तक्रार अर्जात नमूद करून बिल्डरने फ्लॅट धारकांना फसविल्याचा आरोप फ्लॅट धारकांनी केला आहे.

फेब्रुवारी महिन्यात फ्लॅट धारकांनी आंदोलन करून बिल्डरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यावेळी आमदार अशोक पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पीएमआरडीए अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करून कारवाई करण्यास सांगितले जाईल असे आश्वासन दिले होते. अशोक पवार यांनी देखील पीएमआरडीएला कायदेशीर कारवाई करण्याची लेखी मागणी केली होती. बिल्डरकडून फसवणूक होत असल्याने फ्लॅट धारकांनी पोलिसात बिल्डर व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज केला आहे. याबाबत संबंधित बिल्डरशी संपर्क साधला असता माहिती घेऊन सांगू असे माध्यमाशी बोलताना सांगितले.

Download in JPEG format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page