चौथ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

सुरक्षा साधने न पुरवल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल; वडगाव शिंदे येथील घटना

लोहगाव : वडगाव शिंदे येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदाराविरोधात लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक साधने उपलब्ध न करून दिल्याने ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

गजानन साहु (वय ३९, रा. गुलाब हरी वस्ती, वडगाव शिंदे रोड) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गुलाब हरी वस्ती, वडगाव शिंदे (ता. हवेली, जि. पुणे) येथे घडली. संदीप विठ्ठल दिघे यांच्या मालकीच्या पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम साईटवर कामगारांकडून काम करून घेताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट, सुरक्षा जाळी आणि सेफ्टी बेल्ट यांसारखी आवश्यक साधने पुरवणे बंधनकारक होते. मात्र, ठेकेदार धोत्रे याने कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध न करून देता काम सुरू ठेवले.

दरम्यान, गजानन साहु हा चौथ्या मजल्यावरील बाल्कनीत लटकलेली लाकडी फळी घेण्यासाठी गेला असता त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. या अपघातात त्याच्या मांडीला व कमरेच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. हाडे फ्रॅक्चर झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी ठेकेदार धोत्रे याच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप अटक करण्यात आलेली नाही. लोहगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

» दोन महिन्यांपूर्वीची घटना; तपासानंतर गुन्हा दाखल

सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. तपासादरम्यान बांधकाम साईटवर कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक साधने न पुरवल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page