काळ्या यादीतील ठेकेदाराची मुजोरी

महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला धमकी; जीविताला धोका असल्याची अभियंत्यांची भीती; मानसिक तणावामुळे तातडीने रजेवर जाण्याचा निर्णय

पुणे : पुणे महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाकडून नुकतेच काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या एका ठेकेदाराने चक्क विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाच धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धमकीमुळे संबंधित अभियंता मानसिक तणावाखाली आले असून, त्यांनी आपल्या जीविताला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे, तर तातडीने रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

येरवडा परिसरात मलनिस्सारण विभागाच्या कामादरम्यान रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिक प्रदीप लक्ष्मण परदेशी (वय ६९) यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर संबंधित ठेकेदाराच्या कामातील निष्काळजीपणा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. या प्रकरणाची दखल घेत महापालिका आयुक्तांनी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली होती. तसेच त्याची सुरू असलेली सर्व कामे थांबविण्यात आली होती.

या प्रकारानंतर संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी पत्राद्वारे आपली व्यथा मांडली आहे. “ठेकेदाराने धमकी दिल्याने माझा रक्तदाब वाढला आहे. माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ठेकेदाराची राहील. सध्या तरी मी तातडीने रजेवर जात आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली भीती व्यक्त केली आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावताना ठेकेदारांच्या धमक्यांना सामोरे जावे लागत असेल आणि जीविताच्या भीतीने रजेवर जाण्याची वेळ येत असेल, तर ही बाब प्रशासनासाठी अत्यंत गंभीर आहे. ठेकेदारांवर कारवाई करण्याचे धाडस दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभे राहणार की त्यांना अशाच प्रकारे दबावाखाली काम करावे लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत सटोटे यांनी संबंधित ठेकेदाराच्या यापूर्वीच्या सर्व कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच येरवडा दुर्घटनेप्रकरणी केवळ ठेकेदारावर कारवाई करून चालणार नाही, तर संबंधित जबाबदार कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंत्यांनाही जबाबदार धरून निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदनही दिले आहे.

आता या गंभीर प्रकाराची महापालिका आयुक्त कितपत दखल घेतात, धमकी देणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई होते आणि अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page