कोयता घेऊन कारचा पाठलाग करत फोडल्या काचा
दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वाघोली : जुन्या संशयाच्या कारणावरून तडीपार आरोपीताने साथीदारासह तरुणाचा कोयता घेऊन पाठलाग करत त्याच्या कारच्या काचा फोडल्याची घटना कोलवडी-मांजरी रोडवरील चिंतामणी आंगण सोसायटी ते मांजरी पोलीस स्टेशन दरम्यान परिसरात बुधवारी (ता. १८) सकाळी पावणे बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर भालसिंग आणि साहील तांबोळी (दोघे रा. कोलवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेश भालसिंग (वय २६, रा. कोलवडी) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी संशयावरून सागरने त्यांना मारहाण करून व धमकी दिली होती. याच जुन्या वादातून बुधवारी सकाळी महेश कारने खराडीकडे जात असताना सागर व साहील मोपेडवरून त्यांच्या मागे आले. सागरच्या हातात कोयता होता. दोघांनी कार अडवून शिवीगाळ करून सागरने कोयत्याने कारची पुढील काच फोडली.
जीवाच्या भीतीने महेश यांनी कार न थांबवता मांजरी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. पोलीस ठाण्याजवळ कार उभी करून ते आत गेले असता, सागरने दगड मारून कारची मागील काचही फोडली. त्यानंतर दोघे मोपेडवरून पसार झाले. सागरविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असून त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस तपास करीत आहेत.
मोबाईल शॉपीचे शटर उचकटून चोरी; सराफ दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न
वाघोली : केसनंद ग्रामपंचायतीसमोर बिल्डींगमधील राधाई मोबाईल शॉपी या दुकानाचे शटर कटावणीच्या सहाय्याने उचकटून चोरट्यांनी तीन जुने मोबाईल, रोख रक्कम असा एकूण २० हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. चोरट्यांनी शेजारील एसएस सराफ या दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला. चोरीची घटना गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली असून सीसीटीव्ही मध्ये हुडी घातलेले चार चोरटे कैद झाले आहेत. याप्रकरणी सुमित कुंदूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.










