प्रचंड धुळीमुळे भावडी ग्रामस्थ त्रस्त
प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; लहान मुलांना सर्दी, खोकला व श्वसनाचे त्रास; शेतीतील पिकांचेही नुकसान; वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दखल घेतली जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप

वाघोली : भावडी गाव परिसरातील खडी क्रशरमधून निर्माण होणाऱ्या धुळीने अक्षरशः कहर केला असून, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात उडणाऱ्या धुळीमुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एवढेच नव्हे, तर धुळीचा परिणाम शेतीतील पिकांवरही होत असून पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
खडी क्रशरमधून उडणारी धूळ गावातील घरांमध्ये आणि परिसरात पसरत असल्याने नागरिकांना दररोज धुळीचा सामना करावा लागत आहे. घरातील वस्तूंवर धुळीचे थर साचत असून, मोकळ्या हवेत श्वास घेणेही कठीण होत असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
संबंधित खडी क्रशर परिसरात धूळ नियंत्रणासाठी नियमित पाणी फवारणी, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे बंधनकारक आहे. मात्र, या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते नसल्याने याची प्रशासनाने तपासणी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून हवेच्या गुणवत्तेची तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्रशरचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून लहान मुलांना सतत सर्दी, खोकला व श्वसनाचे त्रास होत आहेत. शेतीतील पिकांवरही धुळीचा परिणाम होत असून नुकसान सहन करावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दखल घेतली जात नाही. संबंधित खडी क्रशरवर कारवाई करून भावडी गाव धूळमुक्त करावे.
– गणेश पवार (सामाजिक कार्यकर्ते)










