पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात

वाघोलीतील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे जखमी

पुणे : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात वाघोलीतील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले आहेत. आज पहाटे १ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास विठ्ठलवाडी कमानीजवळ हा दुर्दैवी अपघात घडला.

​ओमकार अजय सूर्यवंशी (वय २४), शंकर वासुदेव ढोळे (वय २२) आणि कारचालक मयूर सतीश औटी (वय २६/२७) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. तर आशुतोष नंदकुमार मरकड (वय २८) आणि प्रणय भरत शिंदे (वय २४) हे दोघे जखमी झाले आहेत. हे सर्वजण वाघोलीतील फूल मळा रोड परिसरातील रहिवासी आहेत.

​सहायक पोलीस निरीक्षक किशोर तनपुरे दिलेल्या माहितीनुसार, हे पाचही तरुण सोमवार (दि. २३ नोव्हेंबर) पहाटे १.२५ च्या सुमारास फोक्सवॅगन पोलो कारमधून (क्र. MH 12 KE 4174) पुणे-अहिल्यानगर महामार्गावरून लोणीकंदच्या दिशेने जात होते. विठ्ठलवाडी कमानीजवळ आले असता, चालक मयूर औटी याचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार दुभाजक (डिव्हायडर) ओलांडून पलटी झाली आणि विरुद्ध दिशेने म्हणजेच पुण्याकडे जाणाऱ्या लेनमध्ये सुमारे ६० ते ७० मीटर पुढे घसरत गेली. तिथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला (क्र. MH 16 BC 8174) कारने समोरून जोरदार धडक दिली.

​अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य करत पाचही तरुणांना वाघोली येथील ‘आय मॅक्स’ (I-Max) हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून ओमकार, शंकर आणि मयूर यांना मृत घोषित केले. त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

​दरम्यान, जखमी झालेले आशुतोष मरकड आणि प्रणय शिंदे यांच्यावर आय मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, दोघेही शुद्धीवर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या भीषण अपघातामुळे वाघोली परिसरात शोककळा पसरली आहे.

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page