‘भारतगॅस’कडून ‘लाईट झिप प्रीमियम एलपीजी सेवा सुरू
४ तासांत मिळणार सिलिंडर डिलिव्हरी; त्वरित नवीन कनेक्शन, एक्सप्रेस सेवा आणि हलक्या कॉम्पोझिट सिलिंडरसह ग्राहकांना आधुनिक सुविधांचा मिळणार लाभ

पुणे : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने ग्राहकांना अधिक जलद, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित LPG सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘भारतगॅस लाईट ZIP’ ही नवी प्रीमियम फ्री ट्रेड LPG (FTL) सेवा सुरू केली आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांना त्वरित नवीन गॅस कनेक्शन मिळण्याबरोबरच सिलिंडरची एक्सप्रेस डिलिव्हरीही उपलब्ध होणार आहे.
‘भारतगॅस लाईट ZIP’ अंतर्गत ग्राहकांना अत्यंत सोप्या आणि जलद प्रक्रियेद्वारे नवीन LPG कनेक्शन देण्यात येणार असून, सिलिंडरची ऑर्डर दिल्यानंतर अवघ्या ४ तासांच्या आत डिलिव्हरी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वेळेचे महत्त्व ओळखणाऱ्या ग्राहकांसाठी ही सेवा विशेष उपयुक्त ठरणार आहे.
या सेवेसोबत उपलब्ध होणाऱ्या भारतगॅस लाईट कॉम्पोझिट सिलिंडरमध्ये अनेक आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे सिलिंडर पारंपरिक सिलिंडरपेक्षा हलके असल्याने सहज हाताळता येणार आहे. गंज न लागणारी कॉम्पोझिट बॉडी, पारदर्शक रचनेमुळे उर्वरित गॅसची सहज माहिती, अधिक सुरक्षितता तसेच आकर्षक आणि आधुनिक डिझाइन ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) ही सेवा विशेषतः काम करणारे व्यावसायिक, विद्यार्थी आणि स्थलांतरित नागरिक यांना लक्षात घेऊन विकसित केली आहे. जलद सेवा, विश्वासार्हता आणि वापरण्यास सुलभता यावर भर देत आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत अशी ही प्रीमियम एलपीजी (LPG) सेवा असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
सध्या ही सेवा देशातील ३० शहरांमध्ये सुरू करण्यात आली असून, १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत आणखी ७० शहरांमध्ये विस्तार करून ती एकूण १०० शहरांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरू करण्याचे नियोजन भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने केले आहे.
‘भारतगॅस’ ‘लाईट झिप प्रीमियम’च्या माध्यमातून ग्राहकांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक एलपीजी सेवा मिळणार आहे.










