अॅड. अंजली बांदल यांचा ‘खजिनदार’ पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
पुणे बार असोसिएशन निवडणूक; बुद्धिमत्ता आणि कर्तृत्वाच्या जोरावर मैदानात!
पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे नगरीतील विधी क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या ‘पुणे बार असोसिएशन’ निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सन २०२६-२७ च्या या अटीतटीच्या निवडणुकीत, आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा ठसा उमटवणाऱ्या अॅड. अंजली शरद बांदल यांनी मंगळवारी (दि. ६ जानेवारी) ‘खजिनदार’ पदासाठी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात दाखल केला.
विद्येच्या अंगणात सुवर्ण अक्षरांनी कोरलेले यश :
अॅड. अंजली बांदल यांचा प्रवास हा जिद्द आणि चिकाटीचा वस्तुपाठच आहे. शुक्रवार पेठेतील ‘श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयातून’ त्यांनी कायद्याचे धडे गिरवले. शिक्षणाची उपजत ओढ असलेल्या अंजली यांनी आपल्या विधी शिक्षणाच्या अंतिम वर्षात, तब्बल चार विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण संपादन करून यशाचे शिखर गाठले होते. त्यांच्या या देदीप्यमान शैक्षणिक वारशाने वकिली क्षेत्रातील त्यांच्या प्रवासाची मुहूर्तमेढ भक्कमपणे रोवली गेली.
कौटुंबिक मुळे आणि कर्तृत्वाचा विस्तार :
चाकण परिसरातील खराबवाडी हे त्यांचे जन्मस्थान, तर शिरूर तालुक्यातील करडे हे त्यांचे सासर. मांजरी येथील घुले घराणे हे त्यांचे आजोळ. अशा वैविध्यपूर्ण कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेल्या अॅड. बांदल सध्या वाघोली येथे वास्तव्यास असून पुणे जिल्ह्यात वकिली व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत.
गृहकर्तव्य आणि समाजकार्याचा मेळ :
केवळ कोर्टाच्या पायऱ्यांवरच नव्हे, तर घराच्या उंबरठ्यातही त्या तितक्याच समर्थ आहेत. दोन मुलांचे संगोपन आणि सासूबाईंची सेवा करत, घराची धुरा सांभाळून त्या आपली व्यावसायिक कर्तव्ये पार पाडत आहेत. २०२३-२४ या काळात पुणे बार असोसिएशनच्या ‘सदस्य’ म्हणून त्यांनी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय ठरले आहे.
मागील कार्यकाळातील माझे अनुभव, समाजकार्याची ओढ आणि वकील बांधवांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते, याच्या जोरावर मला खात्री आहे की, माझे सर्व वकील बंधू-भगिनी मला भरघोस मतांनी विजयी करतील असा दृढ विश्वास आहे. – अॅड. अंजली बांदल










