पैसे ऑनलाइन न मिळाल्याच्या वादातून व्यावसायिकाला मारहाण
कारचालकावर वाघोली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल
वाघोली : वाघोली परिसरातील आव्हाळवाडी रोडवरील सावली हॉटेल शेजारील सद्गुरू पार्क येथे धान्य खरेदीचे पैसे ऑनलाइन न मिळाल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कारचालकाने व त्याच्या साथीदारांनी धान्य विक्रेत्यास आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबासाहेब दामोदर गव्हाणे (वय ५६, रा. आव्हाळवाडी, वाघोली) यांचा धान्य विक्रीचा व्यवसाय आहे. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आव्हाळवाडी येथील सावली हॉटेल बाजूला सद्गुरू पार्क येथे धान्य खरेदी करून पैसे ऑनलाइन केले असल्याचे सांगून मारुती डिझायर कार (क्रमांक एमएच १२ टीव्ही ६०५९) वरील चालक निघून जात होता. धान्याचे पैसे खात्यात जमा झाले नसल्याचे फिर्यादीने सांगताच, चालकाने “तुम्ही गाडीत बसा आणि तुमचा स्कॅनर द्या,” असे म्हटले. फिर्यादी गाडीत बसल्यानंतर चालकाने गाडी त्याच्या नातेवाईकांकडे नेऊन फिर्यादीस अद्वातद्वा शिवीगाळ केली. दरम्यान, वडीलांच्या मागे आलेले फिर्यादीचे सुपुत्र ज्ञानेश्वर यांनाही चालकाच्या दोन मित्रांनी मिळून मारहाण केली. या झटापटीत फिर्यादीचे ४,१०० रुपये गहाळ झाले असून “तुला काय करायचे ते कर,” अशी धमकीही त्यांना देण्यात आली.
या प्रकरणी बाबासाहेब गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाघोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलमांन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार राम ढोंबरे करीत आहेत.










