मूलभूत सुविधा नाहीत, मग वाढीव मिळकतकर कशासाठी?
३२ गावांच्या करप्रश्नी आमदार ज्ञानेश्वर कटके यांचे आयुक्तांना निवेदन

वाघोली : पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोलीसह इतर ३२ गावांमधील मिळकतकराचा (Property Tax) गंभीर प्रश्न मार्गी लावून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार ज्ञानेश्वर (आबा) कटके यांनी पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्य शासनाने समाविष्ट गावांमधील मिळकतकर हा संबंधित गावांच्या पूर्वीच्या ग्रामपंचायतीकडून आकारण्यात येणाऱ्या कराच्या दुपटीपेक्षा अधिक नसावा, असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. मात्र, या निर्देशांनंतरही पुणे महापालिकेकडून अद्याप कोणताही ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. उलट, नागरिकांना करसवलत देण्याबाबत निर्णय घेण्याऐवजी थेट कर वसुलीसाठी राज्य शासनाकडे परवानगी मागण्यात आल्याची बाब आमदार कटके यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
वाघोलीसह समाविष्ट ३२ गावांमध्ये आजही रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. पुणे शहराच्या तुलनेत या गावांमधील पायाभूत सुविधांची स्थिती अद्याप समाधानकारक नाही. नागरिकांना शहराप्रमाणे सुविधा मिळत नसताना त्यांच्याकडून शहराच्या धर्तीवर मिळकतकर आकारणे अन्यायकारक ठरेल, अशी भूमिका त्यांनी पत्रातून मांडली आहे.
त्यामुळे जोपर्यंत समाविष्ट ३२ गावांमध्ये पुणे शहराच्या धर्तीवर संपूर्ण पायाभूत व मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत राज्य शासनाच्या निर्देशानुसार येथील नागरिकांना मिळकतकरात आवश्यक ती सवलत देण्यात यावी. तसेच या संदर्भात पुणे महापालिकेने तातडीने सकारात्मक धोरणात्मक निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार ज्ञानेश्वर (आबा) कटके यांनी केली आहे.










