केसनंद रोडलगतची अतिक्रमणे काढण्याची मागणी
सरपंच दत्तात्रय हरगुडे यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन
वाघोली : वाघोलीच्या हद्दीमध्ये केसनंद रोडलगत मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली असल्याने या रोडलगतची अतिक्रमणे काढावी अशी मागणी केसनंदचे सरपंच दत्तात्रय हरगुडे यांनी नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाघोलीलगत असलेल्या केसनंद गावाची लोकसंख्या वाढलेली आहे. नागरिकांची रहदारी व वाहनांची वर्दळ खूप मोठ्याप्रमाणात वाढल्यामुळे त्याचा परिणाम वाघोली केसनंद रस्त्यावर होत आहे. हा रोड अष्टविनायक रस्त्याला जोडला आहे. वाहतुकीचे प्रमाण खूप मोठ्याप्रमाणावर वाढलेले असल्याने हे वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाघोली केसनंद रोडवरील अतिक्रमणे काढणे अत्यंत गरजेचे आहे. लवकरात लवकर अतिक्रमणे काढून टाकावीत अशी मागणी निवेदनाच्या केसनंद ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच ग्रामस्थ, वाहनचालकांनी केली आहे.










