लोकवर्गणीतून सीसीटिव्ही बसविल्यास लोहगाव मधील गुन्हेगारी कमी होईल: पोलीस निरीक्षक खोबरे
पोलीसांची गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी

लोहगाव : प्रतिनिधी
लोहगाव मधील वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासठी प्रमुख रस्त्यांवर सीसीटिव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे. कॅमेरा लावण्यासाठी लोहगाव मधील दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास संपूर्ण परिसर सुरक्षित राहील असे मत विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी व्यक्त केले.
लोहगाव- वाघोली रोड परिसर, पवार वस्ती सह संपूर्ण लोहगाव परिसरात घरफोडी, लूटमार, यासह गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. या भागांत पोलिसांची गस्त वाढवावी, गुन्हेगारांवर अंकुश ठेवावा आशा मागणीचे निवेदन शिवसेना (उबाठा) पक्ष तसेच स्थानिक नागरिकांच्या वतीने विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळ यांच्याशी अधिकारी खोबरे यांनी चर्चा केली. यावेळी सामजिक कार्यकर्ते दिपकतात्या खांदवे, सचिन खांदवे, अमोल पवार, निलेश पवार, पत्रकार हर्षवर्धन पवार, उदय पवार, यादवराव रत्ने, प्रकाश निकम आदी उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक खोबरे म्हणाले, लोहगाव परिसर खुप मोठा आहे. त्या मानाने पोलिस कर्मचारी कमी आहेत. तरी देखील पोलिस गुन्हे कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. लोहगाव मधील प्रमुख रस्त्यांवर सीसीटिव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे गुन्हेगाराना पकडण्यासाठी अडचणी येत आहेत. सुरक्षितेच्या दृष्टीने लोकवर्गणी तून सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजेत. दानशूर व्यक्तींनी देखील यासाठी पुढे आले पाहिजेत. सीसीटिव्ही बसविल्यास गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल. पोलिसांची गस्त देखिल वाढवली जाईल असे आश्वासन खोबरे यांनी दिले.










